"उद्धव साहेबांचे आदेश आहेत म्हणून सहन करतोय," खा. हेमंत पाटील यांनी व्यक्त केली खदखद
महाविकास आघाडीत शिवसैनिकांचं नुकसान होत आहे. शिवसैनिकांचा वापर केला जात असून फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून आपण हे सहन करतोय असं पाटील यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.;
मुंबई// राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे,तरी तिन्ही पक्षातील नेते मात्र अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. एकीकडे काही नेते महाविकास आघाडी झाल्याने समाधान व्यक्त करत असताना दुसरीकडे काही नेते मात्र खदखद व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनातील ही खदखद व्यक्त केली असून महाविकास आघाडीत शिवसैनिकांचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसैनिकांचा वापर केला जात असून फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून आपण हे सहन करतोय असं पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले की, "१०० टक्के शिवसैनिकांचं नुकसान होत आहे. शिवसैनिकांचा वापर केला जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे निधी, पदाधिकाऱ्यांच्या समितीवरच्या निवडी यासंदर्भात शिवसैनिकांना कुठेही लक्षात घेतलं नाही. वरिष्ठांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्यात. खरं तर हे जाहीरपण बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेचा एक निष्ठावान शिवसैनिक आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही हे शांतपणे सहन करतोय".असं पाटील यांनी म्हटले आहे.