मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझमध्ये (Cruise)सुरू असलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी (rave party) अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला NCBने अटक केली आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांना अटक केल्यानंतर जे.जे. हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अटक केलेल्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. क्रुझवर NCBच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जही(drugs) सापडले आहे. यामध्ये कोकेन, मेफाड्रीन या ड्रग्जचा समावेश आहे. शनिवारी क्रुझमधील रेव्ह पार्टीवर NCBने छापा टाकला होता. त्यानंतर 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये आर्यनसह अरबाज आणि मुनमुन यांचाही समावेश आहे. या सगळ्यांची NCB ने कसून चौकशी केल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे.
आर्यनचे म्हणणे काय?
दरम्यान आर्यन खान याने आपण या पार्टीचे तिकीट खरेदी केले नव्हते तर आपल्याला या पार्टींला आमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती NCBला दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. आपण कोणतेही ड्रग्ज खरेदी केले नाही, असाही दावा आर्यन खान याने केल्याची माहिती मिळते आहे.
या कारवाईमध्ये 8 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती NCBचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे(Sameer Vankhede) यांनी दिली आहे. आर्यन खान,(Aryan Khan) अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकेर, गोमीत चोप्रा यांचा समावेश आहे.
कुणाचाही मुलगा असला तरी दोषी असल्यास कारवाई – NCB प्रमुख
या सर्वांना चौकशीसाठी NCBच्या मुंबई ऑफिसमध्ये आणले गेले आहे. यापैकी तीन तरुणी असून त्या तिघीही दिल्लीमध्ये राहणाऱ्या आहेत. दरम्यान या कारवाईमध्ये कोणत्याही अभिनेत्याचा किंवा उद्योगपतीचा मुलगा असला तरी NCB आपल्या नियमांप्रमाणे कारवाई करेल, अशी प्रतिक्रियी NCBचे प्रमुख एस.एन.प्रधान यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणात ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी सुरू आहे, त्या चौकशीमधून काय माहिती समोर येते यावर पुढील कारवाईची दिशा ठरेल अशी माहितीही त्यांनी दिली. पण ड्रग्ज सेवन करण्यापासून कुणालाही रोखणे हे आमचे काम आहे आणि ते आम्ही कऱणारच असेही प्रधान यांनी म्हटले आहे.
क्रुझ कंपनीचे म्हणणे काय?
दरम्यान ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती त्या कॉर्डेलिया क्रुझ (cordelia cruises) कंपनीने या पार्टीशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगितले आहे. दिल्लीमधील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने क्रुझ भाड्याने घेऊन पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे आम्ही NCBला चौकशीमध्ये सर्वतोपरी सहाय्य करत आहोत, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान रेव्ह पार्टीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या 10 जणांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबईतील बेलापूरमध्ये NCBने छापे टाकल्याचीही माहिती मिळते आहे.