तुमच्या पैशांपेक्षा खासगी आयुष्य महत्त्वाचे, सुप्रीम कोर्टाने वॉट्सअपला फटकारले
तुमच्या पैशांपेक्षा लोकांचे खासगी आयुष्य महत्त्वाचे आहे, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने वॉट्सअपला फटकारले आहे. वॉट्सअपच्या नवीन धोऱणातील प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने वॉट्सअपला फटकारत फेसबुक, वॉट्सअप आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
वॉट्सअपच्या प्रायव्हसी पॉलिसीला भारतीयांनी विरोध केला आहे, तुमची बलाढ्य कंपनी असली तरी लोकांच्या त्यांच्या खासगी आय़ुष्याचे महत्व जास्त आहे, या शब्दात सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, ए.एस. बोपन्ना आणि व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीटाने फटकारले. याचिकाकर्त्यांचे वकील श्याम दिवाण यांनी भारतात डाटा संरक्षणाची कायदेशीर तरतूद नसल्याचे आपल्या युक्तीवादामध्ये सांगितले.
त्यावर कोर्टाने दिवाण यांनी ही महत्त्वाची माहिती दिल्याचे सांगत २ किंवा ३ ट्रिलियन डॉलरची कंपनी असली तरी लोकांना त्यांच्या प्रायव्हसीचे महत्त्व जास्त आहे, असे सुनावले. याच युक्तीवादामध्ये दिवाण यांनी वॉट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी युरोपीयन वापरकर्त्यांपेक्षा भारतीयांना दुय्यम समजणारी आहे, असाही आरोप केला. तर वॉट्सपची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी वापरकर्त्यांच्या डाटाचा वापर केला जाणार असल्याचा आरोप फेटाळून लावला. तसेच "ही प्रायव्हसी पॉलिसी युरोप सोडून सर्वत्र लागू असेल कारण युरोपात यासंदर्भात कायदा अस्तित्वात आहे. भारतात जर असा कायदा असेल तर आम्ही त्याचे पालन करु" असेही सिब्बल यांनी सांगितले.