नांदेड शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून भरदिवसा हत्या केल्याने महाराष्ट्र हादरला आहे. तर गोळीबाराच्या प्रकरणामुळे नांदेड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात नांदेड शहरातील कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तर संजय बियाणी यांना दोन वर्षांपुर्वी खंडणी न दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर संजय बियाणी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र 15 दिवसांपुर्वी संजय बियाणी यांचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. त्यानंतर आज घडलेल्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी संजय बियाणी हे आपल्या कारमधून उतरून घराकडे जात असताना आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर संजय बियाणी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे संजय बियाणी यांचे निघन झाले.
संजय बियाणी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र संजय बियाणी यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.