मालिक तो महान है, बस चमचों से परिशान है, सामनातून भाजपवर निशाणा
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यातच दररोज पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप, टीका, टोमणे सुरू आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांत भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मालिक तो महान है, बस चमचों से परिशान है|
गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी हे फक्त दोनच तास झोप घेतात, असे आश्चर्यकारक वक्तव्य केले होते. त्यावरून विविध मीम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यापाठोपाठ सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा या वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशाच्या राजकारणात सरळ दोन गट पडले आहेत. त्यामध्ये अंधभक्तांची फौज आणि चमचे महामंडळ. हे दोन्हीही देशासाठी घातक आहेत. त्यामुळे भाट, भांड आणि चमचे ज्या राज्याच्या निर्णय प्रक्रीयेत असतात ते राज्य रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही, असा टोला सामनातून लगावला आहे. तर सध्या पंतप्रधान मोदी हे अशाच चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. त्याबरोबरच काँग्रेसच्या काळात चमचे होते तर आता भाजपच्या काळात त्यांची जागा अंधभक्तांनी घेतली आहे. तर काँग्रेसच्या काळात देवकांत बरुआ यांनी इंदिरा इज इंडिया अशी घोषणा दिली होती तर भक्त आता मोदी इज इंडिया अशी घोषणा देत आहेत. त्यातच जे लोक मोदींबरोबर नाहीत ते देशद्रोही असे टोक भक्तांनी गाठले आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत मोदी 22 तास काम करतात आणि दोनच तास झोपतात, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मोदींना लागणारी दोन तास झोपही यापुढे लागू नये, असे पाटील यांचे वक्तव्य असल्याचा टोला सामनाच्या रोखठोक सदरात लगावला आहे. तर भक्त आणि चमच्यांना इतके मानसिक बळ कुठून येते असा सवाल यावेळी विचारला आहे.
अंधभक्त आणि चमच्याविषयी सांगताना आचार्य रजनीश यांची मुल्ला नसरुद्दीन आणि नवाब यांची कथा सांगितली आहे. त्यामध्ये भेंडी ही कशी चांगली ते भेंडी कशी वाईट असे दोन्ही वक्तव्य पटवून देणाऱ्या नसरुद्दीनच्या चमचेगिरीबद्दल सांगितले आहे. तर सम्राटाला भेंडी आवडली तर भेंडी चांगली आणि नाही आवडली तर वाईट अशी स्थिती असल्याचे सामनात म्हटले आहे. तर कोथरुडचे पाटील मोदींच्या झोपेवर संशोधन करायला निघाले आहेत, अशी टोमणा सामनातून लगावला आहे.
जे राज्य चमचे निर्माण करतात ते राज्य चमच्यांचे बनते. त्यातून अंधभक्त निर्माण होतात. पाटील यांच्यासाठी मोदी हे देव आहेत. पण देवांनाही चमचे होते. पण ते देव झोपत नाहीत, असे कधी म्हणाले नाहीत. तर साधू, संत, योगी पुरूष किंवा सिध्दपुरूष हे मानवी गरजेनुसार झोप घेतात. मात्र मोदी हे अखंड जागे राहतात, असे वक्तव्य केल्याने स्वर्गातील देवांचीही झोप उडाली असेल असा टोला सामनाच्या रोखठोक सदरातून लगावला आहे.