सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट , मित्राला जीवदान देणाऱ्या पोलिसासाठी लिहिली इमोशनल पोस्ट
सचिनच्या जवळच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. ट्रॅफिक पोलिसाच्या तत्परतेमुळेच त्याचा जीव वाचला. त्यानंतर सचिननं थेट त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेऊन त्याचे आभार मानले.;
मुंबई // 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक मोठे रेकॉर्ड केलेत. सचिनचे मोठेपण हे केवळ त्याच्या मैदानातील कामगिरीवर अवलंबून नाही. ते त्याने मैदानाबाहेरही अनेक अभिमानस्पद कामं केली आहेत. असाच काहीसा प्रसंग समोर आला आहे.
सचिनच्या जवळच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. ट्रॅफिक पोलिसाच्या तत्परतेमुळेच त्याचा जीव वाचला. त्यानंतर सचिननं थेट त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेऊन त्याचे आभार मानले. सचिन फक्त एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून संबंधित पोलिसाचे आभार मानलेत.
A heartfelt thanks to all those who go beyond the call of duty. pic.twitter.com/GXAofvLOHx
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 17, 2021
सचिननं ट्विटरवर 'त्या' ट्रॅफिक पोलिसाची प्रशंसा करणारा एक लेख शेअर केला. 'या व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे...' असे शिर्षक सचिननं या लेखाला दिले आहे. त्यामध्ये सचिन म्हणतो, 'काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या व्यक्तीचा गंभीर अपघात झाला. देव कृपेने आता तो बरा आहे. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे.
ट्रॅफिक पोलिसाने समयसूचकता दाखवली. त्याने तातडीने जखमी व्यक्तीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला आणखी त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मी त्या ट्रॅफिक पोलिसाला भेटलो. या सर्व मदतीबद्दल त्याचे आभार मानले.'
सचिननं पुढे लिहलंय की, 'आपल्या सर्व बाजूंना अशी अनेक मंडळी आहेत, जी दुसऱ्यांना मदत करतात. या व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे. इतरांची सेवा करणाऱ्या या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी काही वेळ काढला पाहिजे.' सचिनने यावेळी ट्रॅफिक पोलिसांची त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली. तसंच सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.