#Ukraine - Russia Ukraine War : अमेरिकेचे रशियावर कठोर निर्बंध

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारले आहे. त्यापार्श्वभुमीवर G7 नेत्यांशी चर्चा करून अमेरिकेने रशियाविरोधात कठोर निर्बंध लावले आहेत.;

Update: 2022-02-25 03:02 GMT

रशिया आणि युक्रेनमधील वादाचे रुपांतर युध्दात झाल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे. तर यातून जगाची विभागणी दोन गटात व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे यातून तिसऱ्या महायुध्दाला तोंड पडू शकते का? असा सवाल विचारला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी G7 देशांच्या नेत्यांशी चर्चा करून रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये युक्रेनमधील युध्दाला रशिया जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे अमेरिका युक्रेनच्या धाडसी लोकांच्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अमेरिकेने रशियावर आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर कठोर निर्बंध घातले आहेत त्यामुळे बँकांचा वित्तपुरवठा थांबवल्याने 1 अब्ज डॉलरचा तर गुंतवणूकदारांवर लावलेल्या निर्बंधामुळे रशियाला 1.4 अब्ज डॉलर फटका बसणार आहे. तर अमेरिकेने लावलेल्या तंत्रज्ञान विषयक निर्बंधामुळे लष्करी आधुनिकीकरणासह, एरोस्पेस उद्योग आणि जहाजबांधणी उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. तर याचे रशियाला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात, असे बायडन यांनी सांगितले.

बायडेन यांनी G7 देशांच्या नेत्यांशी संवाद साधल्यानंतर रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग बनण्यापासून मर्यादित ठेवण्यासह सैन्याची वाढ आणि वित्तपुरवठा कमी करण्यासाठीचे निर्बंध लावणे, यासह 21 व्या शतकात स्पर्धा करण्याची त्यांची क्षमता कमी केली जाईल, असे बायडन यांनी सांगितले.

अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर त्याचा थेट परिणाम रशियाचे चलन रुबलवर झाला हे. तर रुबलने दिवसाची सर्वात कमकुवत पातळी गाठली आहे. त्याबरोबरच या निर्बंधांमुळे रशियाचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. रशियन सरकारच्या कर्ज खर्चात 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे, असे बायडन यांनी सांगितले.

अमेरिका गुंडांविरोधात स्वातंत्र्यासाठी उभी आहे, असेही बायडन यावेळी म्हणाले.

आम्ही जगासोबत पारदर्शक आहोत. आम्ही रशियाच्या योजना आणि सायबर हल्ले आणि खोट्या सबबींबद्दल असलेली गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे. ज्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही किंवा काही लपवता येणार नाही, असे मत बायडन यांनी व्यक्त केले.

तेलाच्या वाढत्या किंमतींपासून अमेरीकन व्यावसायाचे संरक्षण करण्यासाठी आमचे प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे आम्ही खर्च कमी करण्याबाबत सक्रीय पावले उचलत आहोत. त्यामुळे अमेरीकन तेल कंपन्यांनी नफा कमवण्यासाठी सद्यस्थितीचा फायदा घेऊ नये, असे आवाहन बायडन यांनी देशातील तेल उद्योजकांना केले.

बायडन यांनी युक्रेनच्या नागरीकांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, पुढील काही दिवस, आठवडे किंवा महिने युक्रेनच्या नागरीकांसाठी वेदनादायी असतील. त्यांच्यावर पुतीन यांच्यामुळे संघर्ष ओढावला आहे. पण युक्रेनच्या लोकांना 30 वर्षांचा स्वातंत्र्यलढा माहित आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या देशाला मागे नेण्याचा प्रयत्न केला तरी युक्रेन सहन करणार नाही, असा संदेश दिला आहे.

त्यामुळे युक्रेन रशिया युध्दाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे तिसऱ्या महायुध्दाचे ढग जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Tags:    

Similar News