NDTV : वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा...

NDTV चे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वाचा नेमकं काय आहे कारण?

Update: 2022-11-30 15:46 GMT

NDTV वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते NDTV या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत होते. कालच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता रवीश कुमार यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.

अदानी समूहातील तीन कंपन्यांनी NDTV तील 29.18 टक्के शेअर्सचे अप्रत्यक्षरित्या अधिग्रहण केले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीतील 26 टक्के शेअर्स थेट विकत घेण्यासाठी अदानी समुहाने शेअर्स होल्डरकडे 5 डिसेंबरपर्यंतचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर सोमवारी कंपनीचे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या पदाचा दिला होता. आज त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.

नक्की प्रकरण काय आहे..

विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या NDTV ची प्रवर्तक कंपनी असलेल्या RRPR होल्डिंग्ज ला कर्ज देणाऱ्या आणि अदानी समुहाचा घटक असलेल्या कंपनीला न फेडलेल्या कर्ज रकमेचे समभागांमध्ये रुपांतर करून NDTV त 29.18 टक्के शेअर्स मिळवण्यासाठी सेबीची मंजूरी आवश्यक ठरेल, असा दावा NDTV ने केला होता. मात्र यानंतर आता थेट NDTV चे संचालक मंडळच बदलल्याने NDTV चा ताबा अदानी समूहाकडे जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे सेबीने कर्जप्रकरणाच्या संदर्भाने 27 नोव्हेंबर रोजी सेबीने NDTV चे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना भांडवली बाजारातील प्रवेश, शेअर्सची खरेदी किंवा विक्री याबरोबरच इतर व्यवहारांना प्रतिबंध केला होता. त्यामुळे सेबीने दिलेली मुदत संपताच NDTV चे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे NDTV अदानी समूहाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रणव आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्या नंतर रवीश कुमार देखील राजीनामा देणार अशी चर्चा होती आणि अखेर त्यांनी राजीनामा देत NDTV मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

रवीश कुमार हे तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याासाठी ओळखले जातात. NDTV वर त्यांचे रवीश की रिपोर्ट, देश की बात, प्राईम टाईम असे अनेक शो गाजलेले आहेत. पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोनदा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगेसेसे पुरस्कारानं त्यांना सन २०१९ मध्ये सन्मानितही करण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News