Rashmi Shukla case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील फोन टॅपिंग केसची फाईल बंद

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील केसची फाईल बंद करण्याचा अहवाल पुणे पोलिसांनी दिला आहे.

Update: 2022-10-08 01:52 GMT

महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणी विरोधकांनी तात्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर विधी मंडळाच्या उच्चस्तरीय समितीने पावसाळी अधिवेशनात अहवाल सादर केला होता. त्यात पुण्याच्या तात्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल बंद करण्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिवेशन चांगलेच गाजवले. त्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विधी विभागाच्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करण्याच्या नावाखाली पुण्याच्या तात्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृह विभागाच्या अप्पर सचिवांची परवानगी न घेता फोन टॅप केले होते, असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

काय फोन टॅपिंग प्रकरण?

पुण्याच्या तात्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृह विभागाच्या अप्पर सचिवांची परवानगी न घेता राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते. यामध्ये तात्कालिन खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे आणि आमदार आशिष देशमुख यांचा समावेश होता. या नेत्यांचे फोन टॅप करताना जे मोबाईल क्रमांक निवडले होते. त्यांचा वापर कोणाकडून होत आहे, याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय नेत्यांचे अनिष्ठ हेतूने फोन टॅप केल्याचा अहवाल पोलिस महासंचालकांनी दिला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील केस बंद करण्याचा अहवाल पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Tags:    

Similar News