पुणे : राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तर त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. तर या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला. त्यानंतर राज्य सररकारने दिलेल्या आदेशानुसार पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेलिग्राफ अॅक्टच्या उल्लंघनामुळे रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.
काय आहे प्रकरण :
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची कृती भारतीय टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन ठरते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसेच ही कृती व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा चौकशी अहवाल सिताराम कुंटे यांनी दिला होता.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देत राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करत पोलिस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन केली होती. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार शासनाने रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन येथे गुन्हा दाखल केला आहे.