मारुतीची किंमत वाढली...

देशात वाढत असलेल्या महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यातच आता मारुतीची किंमत वाढली आहे.

Update: 2022-04-19 04:39 GMT

देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच वाढणारे इंधनाचे दर, खाद्यतेलाचे दर यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना आता मारूतीच्या किंमतीही वाढल्या असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

वाढत असलेले इंधनाचे दर, खाद्यतेलाचे दर, नैसर्गिक गॅसचे दर वाढत असतानाच आता वाहन उद्योगातून सर्वसामान्य नागरिकांना निराश करणारी बातमी आली आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे वाहन असलेल्या मारुतीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 

गेल्याच आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमती मध्ये 2.5 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकी ने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये 0.9 ते 1.9 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने सोमवारी या संदर्भात एक निवेदन सादर केलं आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं या कंपन्यांनी म्हटलं आहे.

मारुती सुझुकी या कंपनीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतींमध्ये सरासरी 1.3 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती सुझुकी या कंपनीने जानेवारी 2021 पासून ते मार्च 2022 पर्यंत त्यांच्या गाड्यांच्या किंमती मध्ये साधारणतः 8.8 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कोरोना नंतर महागाईचा जोरदार फटका वाहन उद्योगालाही बसला असल्याचे दिसून येत आहे. मात्र या निर्णयामुळे वाहन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना आपल्या इच्छांवर मुरड घालावी लागणार आहे किंवा जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

मारुतीच्या  किंमतीमध्ये वाढ मात्र इंधन दर १३ व्या दिवशीही स्थिर

एकीकडे सलग वीस दिवस  इंधनाच्या दरात होणारी वाढ आता स्थिरावली आहे. त्यातच वाढत्या इंधनाच्या  किंमती स्थिरावल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. 


Tags:    

Similar News