रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस?
रायगडात जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस? वाचा रायगड जिल्ह्यातील पावसाचे सर्व अपडेट;
रायगड: महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्हयात आत्तापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात सरासरी 165.18 मि.मी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे 331.40 मि.मी आणि कर्जत येथे 321.80 मि.मी झाली आहे. जोरदार पावसामुळे कुंडलिका, अंबा व सावित्री नद्यांची धोका पातळी ओलांडली असून नदी किनारी सखल भागातील पाणी भरले आहे. सर्व यंत्रणांना व नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
इंडियन कोस्ट गार्ड, मुरुड, स्थानिक बचाव पथके तत्पर ठेवण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हयात दि.19 जुलै 2021 रोजी पासूनच्या अतिवृष्टीमध्ये एकूण 10 व्यक्ती पाण्याच्या प्रवाहामध्ये बेपत्ता झालेल्या असून त्यापैकी 7 व्यक्तीचे मृतदेह कालपर्यंत आढळून आले आहेत. उर्वरीत 3 व्यक्तींचा शोध सुरु आहे.
एका व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाला आहे. असे एकूण 8 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे व 3 व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत.
19 जुलै 2021 ला मौजे देवपाडा गाव ता. कर्जत येथे प्रमोद जंगन जोशी, वय 25 वर्ष पोशीर नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला असून स्थानिक प्रशासनाकडून शोध व बचाव कार्य सुरु आहे
मौजे पडगे ता. पनवेल येथील नदीच्या प्रवाहामध्ये भाऊ बन्सारी ही व्यक्ती वाहून गेली असून अदयाप बेपत्ता आहे. स्थानिक प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांकडून शोध सुरू आहे..
22 जुलै 2021 ला मौजे दामत ता. कर्जत मध्ये इब्राहिम मुनियार, वय 40 वर्षे व झोया मुनियार, वय 5 वर्षे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहेत. शोध व बचाव कार्य सुरु आहे.
महाड येथील अप्सरा हॉटेल समोरील पितृछाया बिल्डींग मधील संजय नारखेडे वय 50 वर्षे हे छतावरून पडले असता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा
दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आत्तापर्यंत अनेक लोकांना प्रशासनाने स्थलांतरीत केलं आहे.
आत्तापर्यंत कर्जत तालुक्यातील 25 कुटुंबातील सुमारे 80 व्यक्तींना महाड तालुक्यातील120 व्यक्तींना खालापूर तालुक्यातील 57 कुटुंबातील 200 व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण 400 व्यक्तींचे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली...
महाड, पोलादपूर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली असून महाड शहर व सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.
शहरातील दादली पुलावरून पाणी वाहत आहे, शहरातील व नदीकिनारी सखल भागांमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे.
कर्जत तालुका पावसाचे अपडेट...
खांडपे व इतर सखल भागातील पाणी ओसरले असून परिस्थिती सामान्य होत आहे.
मौजे भूतिवली आदिवासीवाडी येथे गोठा पडल्याने 23 शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे.
मौजे माळवाडी, ता. कर्जत येथील पोल्ट्री फार्मचे 6 हजार पक्षांचे नुकसान झालेले आहे.
खालापूर तालुका पावसाचे अपडेट
खोपोली, खालापूर मधील सखल भागातील पाणी ओसरले असून परिस्थिती सामान्य होत आहे.
मौजे बीड-जांबरुंग, ता. खालापूर येथील अजित पोल्ट्री फार्म मधील 22 हजार पक्षांचे नुकसान झालेले आहे.
रोहा तालुका पावसाचे अपडेट
मौजे तारेघर येथील कृषणी कुश्या हिलम यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे.
पनवेल तालुका पावसाचे अपडेट
लाडीवली येथे एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
काल रात्रीच नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
पोलादपूर तालुका पावसाचे अपडेट
पोलादपूर शहरामध्ये जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले आहे.
सिध्देश्वर आळी व सखल भागामध्ये पाणी पातळी वाढली होती. सध्या पाणी ओसरले आहे. पावसाचे प्रमाण वाढत आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.
म्हसळा तालुका पावसाचे अपडेट
आंबेत बागमांडला रस्त्यावरील वावे येथील बायपास पूलावरुन पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रायगड पाटबंधारे विभागाच्या दि. 22 जुलै 2021 रोजीच्या दुपारी 12.00 वाजताच्या अहवालाप्रमाणे सावित्री नदीने पाण्याची धोका पातळी ओलांडली असून कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. इतर नदयांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.
सध्या जिल्हयातील परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासनाला व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.