राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांचे संकेत
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी पाटणा येथे विरोधी आघाडीच्या 20 पेक्षा जास्त पक्षांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी हे 2024 च्या लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असण्याचे संकेत मिळाले आहेत. पण नेमकं काय म्हणाले लालू प्रसाद यादव? जाणून घेण्यासाठी पहा....
लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधी आघाडीच्या 20 पेक्षा जास्त पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी हे संयुक्त विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असण्याचे संकेत दिले आहेत.
विरोधी आघाडीच्या पाटणा येथे झालेल्या बैठकीवर निशाणा साधताना भाजप नेते आणि मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, 2024 साठी नितीश कुमार पाटणा येथे वरात सजवत आहेत. वरातीत नवरा मुलगा असतो. पण या वरातीत नवरा मुलगाच नाही म्हणत 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नसल्याचे म्हटले. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या हटके पद्धतीने उत्तर देतांना राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांनी लांब दाढी वाढवल्याचे दाखवून दिल्यानंतर लालू प्रसाद यादव म्हणाले, राहुल गांधी यांनी दाढी ट्रिम करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. आतापर्यंत तुमचं लग्न व्हायला हवं होतं. पण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही आमचं ऐका आणि लग्न करून टाका. कारण तुमची आई सोनिया गांधी यासुद्धा तुमच्या लग्नाविषयी तक्रार करत असल्याचे लालू प्रसाद यादव म्हणाले.
मात्र यावेळी लालू प्रसाद यांनी रवीशंकर प्रसाद यांना दिलेल्या उत्तरात एक वाक्य महत्वाचे आहे. ते म्हणजे आम्हाला तुमच्या लग्नात वऱ्हाडी व्हायला आवडेल. त्यावरून राहुल गांधी यांनीही तुम्ही सांगत असाल तर मी लग्न करेन. तुमच्या सल्ल्याचा विचार करीन, असं वक्तव्य केलं.
त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी मोदी कुर्ता गुंडाळून टाकण्यासाठी तुमचा टी शर्टच योग्य असल्याचे वक्तव्य कले. त्यामुळे वऱ्हाडी आहेत मात्र नवरदेव कोण म्हणणाऱ्या रवी शंकर प्रसाद यांना लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी हे नवरदेव म्हणजेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असेच अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.
काय घडलं बैठकीमध्ये?
या बैठकीमध्ये मोदींविरोधात एकत्र लढण्यावर सहमती झाल्याचं नितीश कुमार म्हणाले. पुढच्या बैठकीत कोण कुठून लढणार यावर रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
तसेच विरोधी आघाडीची पुढील संयुक्त बैठक ही शिमला येथे होणार असल्याचेही नितीश कुमार म्हणाले. या शिमला येथे होणाऱ्या बैठकीत कुणाला कोणत्या जागा द्यायच्या हे स्पष्ट होईल. कारण सध्या जे सरकारमध्ये आहेत. ते देशहिताचं काम करत नाहीत. ते या देशाचा मुळ इतिहास आणि गाभाच बदलायला निघाले आहेत. ते स्वातंत्र्याची लढाईसुद्धा विसरले आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करू नये, असंही नितीश कुमार म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सगळे नेते आले होते. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन कॉमन अजेंडा तयार करत आहोत. त्यासंदर्भातील बैठक 10 किंवा 12 जुलै रोजी शिमला येथे होणार आहे. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच सगळ्या राज्यांमध्ये एकच रणनिती आखण्याऐवजी प्रत्येक राज्याचा विचार करून रणनिती आखली जाईल, असंही खर्गे म्हणाले.
आमच्यात मतभेद पण आम्ही एकत्र
विरोधी आघाडीच्या पहिल्याच संयुक्त बैठकीत 20 पेक्षा जास्त पक्ष सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मातर त्यानंतर झालेल्या बैठकीत आमच्यात नक्कीच मतभेद आहेत. मात्र आम्ही या देशाची विचारधारा वाचवण्यासाठी विचारांची लढाई लढत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
आमच्यात मतभेद, पण देश एक आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हा देशाची अखंडता धोक्यात येईल, त्यावेळी आम्ही एकत्र येऊ. कारण आम्ही विरोधी पक्षांचे नेते नाहीत तर आम्ही देशप्रेमी आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
भाजप देशात जातीयवादी वातावरण निर्माण करत आहेत त्यामुळे भाजप आणि त्यांचा सहकारी पक्षांचा सामना करायचा असेल तर आपण एकत्रित व्हायलाच पाहिजे. पाटणा येथून सुरु झालेली सुरुवात देशात बदल घडवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.