'The Kashmir Files' वर टीका करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, यशवंत सिन्हा यांचा खोचक टोला
देशभरात चर्चेत असलेल्या द काश्मीर फाईल्स हा चित्रपट देशातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी अनिवार्य करण्याबाबत संसदेत कायदा करा, असे यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करून म्हटले.;
देशात 'The Kashmir Files' या चित्रपटावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्या वादात जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी उडी घेत 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर टीका करणारांना जन्मठेपेची शिक्षा द्या, अशा शब्दात खोचक टोला लगावला आहे.
'The Kashmir Files' हा चित्रपट प्रदर्शनापासून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच हा चित्रपट राजकीय उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन बनवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधताना हा चित्रपट न पाहणारांना जन्मठेपेची शिक्षा द्या, अशा शब्दात खोचक टीका केली आहे.
द काश्मीर फाईल्स चित्रपटाची देशभरात चर्चा रंगली आहे. अनेकांनी या चित्रपटाचे कौतूक करत हा चित्रपट वास्तवावर आधारित असल्याचे म्हटले आहे. तसेच या चित्रपटातून काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे काश्मीर फाईल्स हा चित्रपट काश्मीरी पंडितांविषयीची सहानभुती म्हणून नाही तर राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन बनवल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. त्यातच अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. तर भाजपने हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. या वादात जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी उडी घेत ट्वीट केले आहे.
यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, द काश्मीर फाईल्स हा चित्रपट संपुर्ण भारतात करमुक्त करणे पुरेसं नाही. तर हा चित्रपट सर्व भारतीयांना पाहण्यासाठी अनिवार्य करण्याबाबत संसदेत कायदा संमत केला पाहिजे. तसेच जे हा चित्रपट पाहणार नाहीत त्यांना 2 वर्षे तर जे लोक या चित्रपटावर टीका करतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करा, अशा शब्दात यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
यशवंत सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. मात्र 2009 साली यशवंत सिन्हा यांनी भाजप सोडत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्याबरोबरच विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न यशवंत सिन्हा यांच्याकडून सुरू आहे.