...तर मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन - मुख्यमंत्री ठाकरे

Update: 2021-10-17 02:41 GMT

मुंबई वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने ज्येष्ठ लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचा संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या धर्माविषयी असलेल्या भावनेवर भाष्य केलं. तसेच आपल्या आजोबांनी लावलेले विचारांचे बीज आज मोठे वटवृक्ष झाले आहे असं म्हटलं. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा, पण घराबाहेर पडताना आपला देश हाच एक धर्म असला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

"प्रत्येकाला धर्म आहे. पण माणूस आधी माणूस म्हणून जन्माला येतो. त्यानंतर जात-पात धर्म त्याला चिटकवली जातात. मग काय करायचं? नास्तिकच व्हायचं का? नाही, तुम्ही धर्म जरुर पाळा. मात्र तो सर्व अभिमान आपापल्या घरात ठेवा. घराबाहेर पडताना हा देश माझाच धर्म हीच धारणा असायला हवी . ही भावना घेऊन घराबाहेर पडल्यावर कुणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सोबतच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललो आहे. ते बोलताना हेही मी सांगितलं, हे जे शब्दांचे धन आहे, प्रबो'धन' ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला बोलण्याचं धाडस, कारण लोकशाहीत मत लागतं, त्यासोबत धाडसही लागतं. मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे.

Tags:    

Similar News