सत्तातरानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीत मुंबईत येणार...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील विविध विकास कामांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. त्या सत्ता संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा मुंबईत येत आहेत. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणुक सुरु केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. आणि तशाप्रकारचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलाच्या मैदानावर मोदी यांची मोठी सभा घेण्याची भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपनं मिशन २०२४ च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपली रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अनेक विकासकामांचे उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरकारकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात उभारत असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला घेवून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप अत्यंत गांभीर्यपूर्वक नियोजन करत आहे. त्यामुळे मोदी यांची मुंबई भेट ही महत्वाची ठरणार आहे.