प्रशांत किशोर यांच्या I Pac चं भवितव्य धोक्यात?
प्रशांत किशोर लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेस करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्यांच्या या प्रवेशाने त्यांना राजकीय वर्तुळात मोठं करणाऱ्या I PAC चं भवितव्य धोक्यात आलं आहे. वाचा काय कारण आहे....;
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळ जवळ निश्चित मानलं जात आहे. गेल्या वर्षी देखील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, प्रशांत किशोर यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होता होता राहिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी थेट कॉंग्रेसच्या शिर्ष नेतृत्वावरच सडकून टीका केली होती.
मात्र, ५ राज्यांच्या निवडणूकीत सपाटून मार खावा लागलेल्या कॉंग्रेसला पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांची गरज भासली. आणि पुन्हा एकदा प्रशांत किशोर हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस च्या बड्या नेत्यांना एक Presentation सादर केलं होते. या प्रेझेंटेशनमध्ये कॉंग्रेसने ३७५ जागा लढाव्यात. असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. प्रशांत किशोर यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनवर कॉंग्रेस नेत्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. या शंकांचं निरसन प्रशांत किशोर यांनी केल्यानंतर प्रशांत किशोर यांचा कॉंग्रेस प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे.
मात्र, या निमित्ताने प्रशांत किशोर यांना ज्या I PAC ने राजकीय वर्तुळात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले त्या I PAC चं काय?
प्रशांत किशोर यांची I PAC ही संस्था वेगवेगळ्या राज्यात कॉंग्रेसच्या विरोधात असलेल्या पक्षाचं काम करत आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेससाठी, आंध्रप्रदेशमध्ये वाइएसआर कॉंग्रेस साठी, तर तेलंगना मध्ये टीआरएस साठी काम करत आहे. तसंच विविध पक्षात असणाऱ्या राजकीय नेत्यांना राजकीय सल्ला देण्याचं काम प्रशांत किशोर करत आहेत. त्यातील अनेक नेते कॉंग्रेस पक्षांच्या विरोधात मैदानात असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळं प्रशांत किशोर यांची गोची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत किशोर जर कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले तर त्यांची कंपनी विविध राजकीय पक्षाशी केलेले करार तोडणार की कॉंग्रेसच्या विरोधात जाऊन काम करणार? असा सवाल या निमिताने उपस्थित होतो.