सांगली लोकसभा मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय, दिला या मोठ्या चेहऱ्याला पाठिंबा

वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत अजूनही निश्चित काही ठरलेले नाही. पण वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. अजून जागावाटपाचा तिढा, युतीचे घोंगडे भिजत असतानाच वंचितने सांगली लोकसभेसाठी एका मोठ्या चेहऱ्याला पाठिंबा दिला आहे.;

Update: 2024-01-08 17:23 GMT

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार असून त्यांच्या उमेदवारीला वंचितने पाठिंबा दिला आहे. राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांच्यामार्फत चंद्रहार पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संदर्भात एका तासापूर्वी पुणे येथे चंद्रहार पाटील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत पाठिंबा द्यावा ही विनंती चंद्रहार पाटील यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारसभेसाठी ते उपस्थित राहणार आहेत.




 


सागली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकत आहे. गत निवडणुकीत वंचितला २ लाख ५८ हजार

मते मिळाली होती.

चंद्रहार पाटील यांचा तगडा जनसंपर्क तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ, कुस्तीच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य तसेच मतदारसंघात आरोग्य शिबिरे तसेच सामाजिक उपक्रमांतून त्यांनी केलेली संघटन बांधणी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

भाजपसाठी मोठा झटका

चंद्रहार पाटलांची उमेदवारी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान खासदार संजय पाटील यांना तगडे आव्हान देण्याची क्षमता चंद्रहार पाटील यांच्यामध्ये असून वंचितच्या पाठिंब्याने त्यांची ताकद आणखी वाढणार आहे.

या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रने चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले “ आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी मला पाठिंबा तर दिला आहेच. विशेष म्हणजे ते माझ्या प्रचारासाठी सांगली येथे विशेष सभा घेणार आहेत”.

वंचितच्या प्रवेशाबाबत त्यांना थेट विचारले असता अजून राज्यात जागावाटप युत्या यांचे काहीही ठरलेले नाही. त्या त्या वेळी हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Tags:    

Similar News