खाकी वर्दीतील आधुनिक सावित्रीचा निराधारांना आधार...

पोलीस खात्यातील आपली जबाबदारी सांभाळत एका महिला पोलिसानी कर्ज काढून मनोरुग्णांसाठी मायेचा निवारा उभारला आहे.. प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा रिपोर्ट..

Update: 2021-12-16 13:30 GMT

नोकरी आणि घर सांभाळून, निराधार, मनोरुग्णांना भरवतेय मायेचा घास... नोकरीवर कर्ज काढून व लोकवर्गणीतून बेघरांना दिला कायमचा निवारा... चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आज महिला विविध क्षेत्रात खंबीरपणे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, कोणी नोकरी सांभाळून संसाराचा गाडा चालवित आहे, तर काही उद्योग व्यवसायातून किर्तीवंत होऊन नावलौकिक मिळवीत आहेत, मात्र बुलडाणा जिल्ह्यात खाकी वर्दीतील अशी एक आधुनिक सावित्री आहे, जी आपली नोकरी आणि घर सांभाळून अनेक अनाथ, बेघर, दुःखी पीडित, मनोरुग्ण, निराधारांना आधार देत आहे...

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती अशोक काकडे यांनी बेघर, निराधार, दिव्यांगांच्या सेवेचा वसा घेतला असून, त्यांनी आपल्या नोकरीवर 35 लाख रुपयांचे कर्ज घेऊन आणि काही प्रमाणात लोक सहभागातून या मनो यात्रिंसाठी आश्रमाच्या माध्यमातून त्यांना हक्काचा आणि मायेचा निवारा उपलब्ध करून दिला आहे...



 


कशी मिळाली प्रेरणा...

ज्योती काकडे यांनी एकदा समाजकार्यात आपले सर्वस्व अर्पण करणारे बाबा आमटे यांचे आत्मचरित्र वाचले, ज्यामध्ये त्यांनी सांगीतले कि समाज सेवेपासून समाधान प्राप्त होते, आणि हेच समाधान शोधण्यासाठी ज्योती काकडे यांनी हेमलकसा येथील बाबा आमटे यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांचे कार्य पाहिले, तेव्हापासूनच  त्यांना प्रेरणा, ऊर्जा मिळाली आणि त्यांनी दिव्य सेवा प्रकल्पाची स्थापना केली...

नोकरीतुन वेळ काढून मनोरुग्णांची अशी करतात सेवा...

दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून निराधार, बेघर, दिव्यांग, मनोरुग्ण यांच्यासाठी काम करत असताना प्रकर्षाने एक बाब काकडे यांना जाणवली, ती म्हणजे याच मनोयात्रींना राहण्यासाठी कायमचा निवारा नाही, आणि त्या दृष्टिकोनातून काकडे दाम्पत्याने लोकवर्गणी गोळा केली, पण तेवढ्या पैशात शक्य होत नसल्याने, ज्योती काकडे यांनी आपल्या नोकरीवर 35 लाख रुपयांचे कर्ज काढून बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथे दिव्य सेवा आश्रम उभा केला, याच दिव्यांगांच्या सेवेचा ध्यास घेतलेल्या ज्योती काकडे यांनी आपल्या पोलीस विभागातील 24 तास असलेली सेवा आणि आपलं कुटुंब सांभाळत नोकरीतून मिळालेला वेळ हा आश्रमाच्या सेवेसाठी देतायत, ज्यामध्ये हे काकडे दांपत्य जवळपास 25 ते 30 लोकांचा सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक करणे, सर्व मनोयात्रींना आंघोळ घालणे, आश्रमाची साफसफाई करणे यासह इतर सर्व कामे ते करत आहेत...

जनतेला आवाहन...



 


काकडे दांपत्यांनी या सर्वच लोकांच्या सेवेचे कंगन उराशी बाळगले असून त्यांना दोन वेळचा घास भरवता यावा यासाठी धडपडत आहेत... सोबतच समाजातील दानशूर व्यक्तींनी देखील या समाजकार्यात पुढे यावे आणि आपला खारीचा वाटा घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन देखील या निमित्ताने ते करत आहेत... समाजामध्ये आजही वाढदिवस, जयंती, वर्षश्राद्ध, पुण्यतिथी यावर अवाढव्य खर्च केला जातो, हा सर्व खर्च टाळून त्यांनी थोडे योगदान जरी आश्रमातील या मनोरुग्णांसाठी दिले आणि त्यांच्यासोबत शक्य होईल तेवढा वेळ घालवला, तर या सर्व लोकांनाही काही वेळासाठी का होईना आपले कुटुंब मिळेल, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होईल, आणि आम्हाला देखील यांची सेवा करण्यासाठी बळ - ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल असे आवाहन ते मोठ्या कळवळीने करत आहेत...

आज रोजी दिव्य सेवा पुनर्वसन प्रकल्पामध्ये 26 पेक्षा जास्त मनोयात्री असून आतापर्यंत तीन ते चार जणांचे समुपदेशन आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबात सुपूर्द करण्यात आले,

अनेक महिने - वर्षानंतर आपल्या कुटुंबापासून दूर गेलेले व्यक्ती जेव्हा कुटुंबात मिसळतात आणि त्यांची सेवा करत असताना जे काय मानसिक समाधान मिळतं ते कुठल्याही कार्यात मिळत नसल्याचे हे दांपत्य आवर्जून सांगतात...

Full View

Tags:    

Similar News