७० वर्षांनंतर भारतात चित्ता परतला, पंतप्रधान मोदींनी चित्ते जंगलात सोडले
गेले अनेक दिवस चर्चेत असलेले चित्ते अखेर भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. भारताच्या धरतीवर 70 वर्षानंतर चित्ता परतला आहे, त्यामुळे जैवविविधेतच्या तुटलेल्या साखळीला जोडण्याची मोठी संधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. वैज्ञानिक सर्व्हेनंतरच कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते आणले गेले आहे. पण चित्ते आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यांना काही वेळ द्यायला हवा, त्यामुळे पर्यटकांना लगचेच चित्त्यांना पाहता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी गेल्या अनेक वर्षात अर्थपूर्ण प्रयत्नच केले गेले नाहीत, अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होत आहे, जेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण होते, तेव्हा आपले भविष्यही सुरक्षित असते, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.