मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी : पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Update: 2022-01-06 12:14 GMT

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याने पंतप्रधानांना 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकूम पडावे लागले. त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेतील त्रुटींवरून मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी भारतीय किसान युनियनने केलेल्या निदर्शनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावर 20 मिनिटे अडकून पडला होता. त्यानंतर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले. तर पंतप्रधानाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने जेष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

दरम्यान पंजाब सरकारने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत. तर पंजाब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अश्विन कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र आता पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले. यावर राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून भेटीचा वृत्तांत सांगितला आहे.

वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियनने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन सुरूच ठेवले आहे. याच आंदोलकांनी बुधवारी पंतप्रधानांचा ताफा फिरोजपुरच्या उड्डाणपुलावर अडवला होता. त्यावरून पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशात वाद रंगला आहे. 

Tags:    

Similar News