जग विनाशाच्या उंबरठ्यावर?, पुतीन यांचे अणूपथकाला सतर्क राहण्याचे आदेश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणूपथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.;

Update: 2022-02-27 15:51 GMT

रशिया युक्रेन युध्द चौथ्या दिवशी महत्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. एकीकडे चर्चेची बोलणी सुरू आहे. तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणूपथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे का? असा प्रश्न पडला आहे.

रशिया युक्रेन युध्द निर्णायक टप्प्यावर पोहचले आहे. तर यामध्ये रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. तर अमेरीकेने युक्रेनला 350 कोटी डॉलरची मदत पाठवली आहे. त्याबरोबरच जर्मनीनेही युक्रेनला युध्दसामग्री पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभुमीवर रशियाने आपल्या अणुपथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाकडून युक्रेनवर अणूहल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याबरोबरच युक्रेन रशियाविरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला आहे. तर अमेरीकेसह युरोपीय देशांनी पुतीन यांच्यासह रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र रशियाने आपली आक्रमक भुमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे जगाची धाकधुक वाढली असतानाच पुतीन यांनी अणूपथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान रशिया युक्रेन युध्दात मोठ्या प्रमाणावर नरसंहार सुरू आहे. तर रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव शहरात पोहचले आहे. दरम्यान युक्रेनने रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर रशियाने सकारात्मक प्रतिसाद देत शिष्टमंडळ पाठवले आहे. तर ही भेट बेलारुसच्या गोमेल शहरात होणार असून रशियाचे शिष्टमंडळ बेलारुसच्या गोमेल शहरात पोहचले आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युध्द चर्चेच्या माध्यमातून थांबणार की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अणूपथकाला दिलेल्या सतर्क राहण्याच्या आदेशामुळे विनाशाकडे घेऊन जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Tags:    

Similar News