संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय ओरोस या ठिकाणी ही सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्ग // संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय ओरोस या ठिकाणी ही सुनावणी होणार आहे. दरम्यान दोन्ही बाजूंच्यावतीने जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परब यांच्याबाजूने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राणे विरुद्ध सेना असा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
नितेश राणे यांच्यातर्फे अॅड. संग्राम देसाई हे बाजू मांडणार आहेत.त्यावेळी त्यांच्याबरोबर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब,प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम त्यांना सहकार्य करेल.
तर सरकारी बाजूकडून अटकपूर्व जामिनाला भक्कम विरोध विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत आणि अॅड. भूषण साळवी हे करतील. विशेष सरकारी वकिलांतर्फे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाला न्यायालयात भक्कमपणे विरोध करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. आज दुपारी 2:45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.