राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांना ठाकरेंवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. केंद्रीय़ मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
EDने केलेल्या कारवाईमध्ये नंदकिशोर चतुर्वेदी यांचेही नाव चर्चेत आले आहे. किरीट सोमय्या यांनीही वारंवार चतुर्वेदी यांचे नाव घेतले आहे. हे नंदकिशोर चतुर्वेदी सध्या कुठे आहेत याची माहिती कुणालाही नसल्याची चर्चा आहे. कारवाईच्या भीतीने नंदकुमार चतुर्वेदी यांनी भारत सोडल्याचीही चर्ता आहे. पण या नंदकुमार चतुर्वेदी यांचा मनसुख हिरेन तर केला नाही ना अशी शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली आहे. नंदकिशोर चतुर्वेदींबाबत आपण अनेक महिने बोलत आहोत, पण ते कुठे आहेत याची माहितीच समोर येत नाहीये, असे राणे यांनी म्हटले आहे.
शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जावायावरील आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचा राजीनामा घेतला होता, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर कारवाई झाल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. तसेच श्रीधर पाटणकर यांच्यासह मुलगा आणि पत्नी यामध्ये आहेत का याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.