2021 नवे वर्ष, नवी आशा: सामना
कोरोनासारख्या भयंकर महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. निराशा, आर्थिक आणि मानसिक कोंडीच्या कडय़ावरून व्यक्ती आणि समष्टीचा कडेलोट होतो की काय, अशी भयंकर भीती सर्वदूर पसरविणारे 2020 अखेर सरले. पण 2021 कडे नवे वर्ष, नवी आशा म्हणूनच पाहायला हवे. त्यातच सगळय़ांचे भले आहे अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूने झाकोळून टाकलेले 2020 हे वर्ष अखेर सरले. कोरोनाच्या भयंकर दहशतीमध्येच संपूर्ण जगाने हे वर्ष घालविले. मैलाचे दगड ठरणाऱ्या घटना, घडामोडी प्रत्येक वर्षी घडतच असतात. परंतु चांगल्या स्मृती कमी आणि वाईट आठवणी जास्त मागे ठेवून जाणारे 2020 हे वर्ष एखादेच असते. अर्थात अजूनही कोरोनाचे भय पूर्णपणे संपलेले नाहीच, पण त्याच्या भयंकर सावटाखालील 2020ची शेवटची रात्र अखेर सरली आहे.
नवीन वर्षाचा, नव्या आशेचा अरुणोदय झाला आहे. कोरोनाच्या भयगंडातून बाहेर यावे लागेल, मात्र त्यासाठी आवश्यक खबरदारीचे भान 2021 मध्येही ठेवावेच लागेल, असाच संदेश सरणाऱ्या वर्षाने मानवजातीला दिला आहे. कोरोना विषाणूने गेल्या वर्षी जगातील सुमारे आठ कोटी लोकांना दंश केला. सुमारे 18 लाख लोकांचा बळी घेतला. आपल्या देशातही कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृत्यूची संख्या लाखातच आहे. भविष्यात असेच किंवा त्यापेक्षाही भयंकर संकट कोसळू शकते, अशी भीती खुद्द जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख मायकल रायन यांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे नव्या वर्षातही सगळय़ांना सतर्क आणि सक्षम राहावेच लागणार आहे. हाच सर्वात मोठा धडा 2020 या वर्षाने दिला आहे.
कोरोनामुळे उघड झालेल्या उणिवा नव्या वर्षाच्या साक्षीने तरी दूर करण्याचा संकल्प सगळय़ांनी केला पाहिजे. कोरोनाकडे संकट म्हणून न पाहता, एक इष्टापत्ती म्हणुन पाहायला हवे अशी अपेक्षा जर नवीन वर्ष ठेवत असेल तर ती चुकीची कशी म्हणता येईल? माणसाला भयंकर संकटाशी जुळवून घेत त्यावर मात करण्याचे बळ दिले ते 2020 नेच. कोरोनावरील प्रभावी लसीबाबत हिंदुस्थानातील तीन कंपन्यांनी विक्रमी वेळात बाजी मारली. हिंदुस्थानी कृषी संशोधन परिषदेने क्लासिकल स्वाइन फिवर या आजारावर नवी परिणामकारक आणि स्वस्त लस तयार केली. न्यूमोनियावरील प्रभावी लसीची निर्मितीदेखील हिंदुस्थानी संशोधकांनी याच वर्षी केली. बालमृत्यूदर घटल्याचे शुभ वर्तमान दिले ते याच वर्षाने. उणे 23 पर्यंत घसरलेल्या जीडीपीमध्ये 10 टक्क्यांची वृद्धी होण्याचे संकेतही 2020 ने सरतासरता दिलेच. ज्या कौटुंबिक अंतरावरून चिंता व्यक्त व्हायची ते अंतरही लॉकडाऊनने कमी केले. पर्यावरणाने, पशूपक्ष्यांनी काही काळ का होईना मोकळा श्वास घेतला तो याच काळात.
फाळणीनंतरची पायपीट हे भयंकर चित्र जसे आपल्या देशाने अनुभवले तशी कोरोनायोद्धय़ांची जिगर, माणुसकीचे बंधदेखील अनुभवले. ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, डिजिटल व्यवहार या नवीन गोष्टी लहानांपासून थोरांपर्यंत सगळय़ांना आत्मसात करायला लावल्या त्या याच वर्षाने. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी, एक सेकंदही न थांबणारी मुंबई काही दिवस पूर्ण ठप्प केली ती कोरोना लॉक डाऊनने. संकट दूर कर म्हणून माणूस ज्या देवांकडे धाव घेतो त्या देवांनाही तब्बल सहा-सात महिने
2020 मध्ये आली. या वर्षभरात अनेक दिग्गज आणि मान्यवरांनीही कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला. कोरोनावरून चेष्टा मस्करी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाय बाय करीत अमेरिकन जनतेने बायडेन यांच्या हाती सत्ता सोपविली ती 2020 च्या अखेरीसच. नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱयांचा भयंकर संताप केंद्रातील सत्ताधाऱयांनी अनुभवला तोदेखील सरते वर्ष संपता संपता. अन्नदात्याच्या या आक्रोशाची, संतापाची दखल केंद्र सरकारने नव्या वर्षात तरी घ्यावी आणि नववर्षाची सुरुवात सत्कर्माने करावी.
प्रत्येक वर्ष संमिश्र घटनांचेच असते. 2020 मध्ये चांगल्या घटना कमी, वाईट घटना जास्त घडल्या. कोरोनासारख्या भयंकर महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. आपल्या देशालाही हे तडाखे सोसावे लागले. निराशा, आर्थिक आणि मानसिक कोंडीच्या कडय़ावरून व्यक्ती आणि समष्टीचा कडेलोट होतो की काय, अशी भयंकर भीती सर्वदूर पसरविणारे 2020 अखेर सरले. मात्र या संकटाला तोंड देण्याचे, प्रसंगी त्याच्या खांद्यावर हात ठेवत, प्रसंगी त्याला शिंगावर घेत पुढे वाटचाल देण्याचे धडेही दिले ते 2020 नेच. जुने जाऊ द्या मरणालागुनी असे सांगणाऱया केशवसुतांनी त्याच कवितेत सावध ऐका पुढल्या हाका असा सल्लाही दिला आहे. त्यानुसारच नव्या वर्षात वाटचाल करावी लागणार आहे. 2020 हे नक्कीच निराशेचे वर्ष होते, पण 2021 कडे नवे वर्ष, नवी आशा म्हणूनच पाहायला हवे. त्यातच सगळय़ांचे भले आहे.