एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चौकशीच्या फेऱ्यात ; बदलीच्या शक्यतेचीही चर्चा

Update: 2021-10-27 03:00 GMT

आर्यन खान अटक प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील 'एनसीबी'च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची चौकशी करण्यात येणार असून, यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी होणार आहे.

मुंबईत क्रुझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणातील साक्षीदार व पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला असून, त्यामुळे वादात सापडलेल्या वानखेडे यांना 'एनसीबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. वरिष्ठांच्या आदेशाने वानखेडे यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली. मात्र, आपण 'एनसीबी'च्या नियमित बैठकीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. काल सकाळी वानखेडे यांनी 'एनसीबी'च्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुमारे दीड तासांच्या भेटीनंतर वानखेडे मुख्यालयातून निघून गेले. वानखेडेंना पाठिंबा देण्यासाठी मुख्यालयासमोर समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल आरोप करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे माहिती समोर येत आहे. तर या पथकाकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News