नथुराम गोडसे भारतातील पहिला अतिरेकी; रणजित सावरकरांच्या पुस्तकावर आव्हाडांचा घणाघात
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज रणजित सावरकर लिखित असलेलं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, असा दावा रणजित सावरकर यांच्याकडून या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता, असा थेट हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तक लिखाणावरुन लेखक रणजित सावरकर यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने मारलं नाही असं सांगितलं जात आहे. मग मारणारी एखादी अदृश्य शक्ती असेल. काही दिवसांनी असंही म्हणतील की, महात्मा गांधी तिथे नव्हतेच, असा उपहासात्मक हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता. त्यामुळे असल्या लेखकांवर न बोललेलं बरं. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
नथुराम गोडसेंनी महात्मा गांधी यांचा खून केला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मग जगभर जिथे जिथे जाता तिथं गांधी समोर नतमस्तक का होता? नेहरूंनी काही काम केलं नाही, मग काय अदृश्य शक्तीने हे केलं का? गांधींना मारून इंग्लंड ला काय फायदा होणार होता? नेहरू-गांधींना बदनाम करण्याचा कट अनेक वर्षापासून सुरू आहे, आता जरा जास्तच सुरू आहे एवढंच. वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का ? हे पाहायचं काम सुरू आहे. जागतिक बाजारात याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. महाराष्ट्र सदनात अशा पुस्तक प्रदर्शनाला परवानगी दिलीच कशी? गोळ्या कोणी झाडल्या हे पाहणारे अनेक साक्षीदार होते. त्यातले एक काकासाहेब गाडगीळ होते, असंही आव्हाड बोलताना म्हणाले.