नाशिकच्या घटनेला जबाबदार कोण?

Update: 2021-04-21 10:27 GMT

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने निष्पाप 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिकेतील जाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सीजनच्या टॅंक लिकेज झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो? कधी कोव्हिड रुग्णालयाला आग लागते. तर कधी कोव्हिड रुग्णालयातील ऑक्सिजन लिक होतो. या सगळ्या घटनांना जबाबदार कोण?

भंडारा, मुंबईच्या जळीतकांडानंतरही सरकारने काही धडा घेतला नाही का? नागपूरमध्ये खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव रूग्णांचा मृत्यू होतो. भांडूपमध्ये 10 रुग्णांचा जळून मृत्यू होतो. कोव्हिड रुग्णालयात महिलांचा विनयभंग होतो. रुग्णालयातच रुग्ण सुरक्षित नसतील तर त्यांनी कुठं जायचं. त्यातच या घटना वारंवार घडत असताना या घटनांमधून आपण काही धडे घेणार आहोत का??

अशा घटना पुन्हा घडूच नयेत. यासाठी योग्य पावलं उचलण्यासात ठाकरे सरकार हात कोणी रोखले आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सध्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ या ठिकाणी पोहोचले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. मात्र, या सर्व लवाजम्याने या लोकांचे जीव परत येणार आहेत का?

नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी "ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे.'' अशी माहिती माध्यमांना दिली आहे. याचाच अर्थ हा आकडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई होणं गरजेचं तर आहेच. त्याचबरोबर कोव्हिड रुग्णालयात घडणाऱ्या घटनांबाबत संबंधीत राजकीय नेत्यांना देखील याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं आहे.

Tags:    

Similar News