नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्लांवर 500 कोटींच्या मानहानीचा दावा, न्यायालयाने बजावली नोटीस

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण आणि त्यामुळे व्यथित झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नागपुरातील दिवाणी न्यायालयात पाचशे कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. फोन टॅपिंग चे हे प्रकरण 2017-18 मध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.;

Update: 2022-03-24 03:53 GMT

त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये या अनुषंगाने तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी राजकीय हितसंबंधामधून नाना पटोले यांच्यासह एकूण सहा लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

नाना पटोले यांनी नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा जो मानहानीचा दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव,राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि फिर्यादी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील एड सतीश उके यांनी कोर्टात पटोलेंच्या वतीने कामकाज पाहिले.

'अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून आमचे फोन टॅप करण्यात आले. माझे नाव अमजद खान असे ठेवले होते. तर बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख अशी मुस्लीम नावे ठेवली होती. फोन टॅपिंगचा मुद्दा मी विधानसभेतही उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते.'

'वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य होतं.'

'अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता असा आरोप करत गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.' अशी मागणी पटोलेंनी केली होती.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले असं म्हणाले होते की, 'राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना 2017-18 साली माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते.

Tags:    

Similar News