नागपूरमधील भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. या प्रकरणात भाजप नेता अमित साहूनंतर काँग्रेस आमदाराचेही नाव समोर आलं आहे. मात्र काँग्रेस आमदाराने आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची अमित साहू या नेत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. भाजप नेता सना खानच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन करत असल्याचेही समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा रंगली होती. ही चर्चा सुरू असतानाच सना खान हत्या प्रकरणात काँग्रेस आमदाराचे नाव आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी काँग्रेसच्या आमदाराला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार काँग्रेस आमदार चौकशीसाठी नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सना खान प्रकरणातील आरोप फेटाळून लावले.
सना खान हत्या प्रकरणात भाजप नेते अमित साहू यांचे कनेक्शन समोर आले होते. मात्र त्यानंतर आता सना खान हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अमित साहूच्या संपर्कातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांचे नाव समोर आले होते. संजय शर्मा हे मध्यप्रदेशमधील तेंदुखेडा या मतदारसंघातून आमदार आहेत. पोलिसांनी संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार संजय शर्मा नागपूरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना, पोलिसांनी बोलावलं म्हणून मी आलो आहे. माझा आणि अमित साहूशी काहीही संबंध नाही. मी अमित साहूला ओळखतही नसल्याचे संजय शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे अमित साहू आणि संजय शर्मा यांची समोरासमोर चौकशी होणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सना खान प्रकरणी आधी भाजप आणि आता काँग्रेसमधील नेत्याचं नाव समोर आलं आहे. मात्र संजय शर्मा यांनी आरोप फेटाळून लावला आहे.