विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदे सरकारने मुंबईकरांना एक मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफीची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे.
या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन करताना म्हटले, “आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. राज्य सरकारचं अभिनंदन करेन, पण हा निर्णय फक्त निवडणुकीपुरता नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.”
राज ठाकरे म्हणाले
“मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथे त्या रस्त्यांना टोलमुक्त केले पाहिजे.”
तसेच, ठाकरे यांनी सांगितले की, “सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो, किमान मुंबईकर टोलमुक्त झाले हे बरे झाले.”
राज्यातील या निर्णयामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळणार आहे. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. मात्र, अटल सेतूसाठी हा नियम लागू होणार नाही.
राज ठाकरे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी देखील केली, “टोलच्या खेळात किती लोकांनी संपत्ती उभी केली, याचा हिशोब व्हायला हवा. परंतु, याची शक्यता कमी आहे.”
या निर्णयामुळे मुंबईतील प्रवाशांचे आर्थिक ओझे कमी होईल, आणि नागरिकांना दिलासा मिळेल.