भोंग्यांच्या वादानंतर मुंबई पोलिस एक्शन मोडवर, पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. त्यातच नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत आदेश जारी केले असताना त्यापाठोपाठ मुंबई पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.;

Update: 2022-04-20 17:45 GMT

भोंग्यांच्या वादानंतर मुंबई पोलिसांनी एक्शन मोडवर येत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊड स्पीकर लावू नयेत. अन्यथा लाऊड स्पीकर लावणारांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा मुंबई पोलिस आयुक्तांनी दिला आहे. तसेच सायलंट झोनमधील धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी देण्यात येणार नाही, असे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आदेश दिले आहेत. 

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले नाही तर आम्ही मशिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आले आहे. तर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी तक्रार कंट्रोल रुमला आली तर त्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी जातीय हिंसाचार, समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांची यादी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम 144, 149 आणि 151 या कलमांतर्गत समाजविघातक घटकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहेत मुंबई पोलिसांचे आदेश?

• सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकरवर पुर्णपणे बंदी असेल.

• सायलंट झोनमध्ये कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात येणार नाही.

• अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात येणार नाही.

• कायदा हातात घेण्याचा किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस एक्शन मोडवर आले आहे.

Tags:    

Similar News