मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांना 'मुकनायक' पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी मुकनायक हे वर्तमानपत्र काढले होते. त्याप्रमाणेच वंचित, शोषितांचे प्रश्न मांडणाऱ्या अशोक कांबळे यांना मुकनायक कृती समितीच्या माध्यमातून मुकनायक पुरस्कार भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आला.;

Update: 2023-02-06 10:04 GMT

सामान्य माणसाला चालना देण्यासाठी महत्वाच्या विषयाचे गांभीर्य समाजापुढे आणण्यासाठी देशातील व राज्यातील मिडीया कमी पडत आहे त्यामुळे 'मुकनायक' च्या 103 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेला परिसंवाद समाजाला दिशादर्शक ठरेल, असा आशावाद भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्‍त केला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या 'मुकनायक' या पहिल्या वृत्तपत्राच्या 103 व्या वर्धापनदिनानिमित्त मुकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने अकलूज येथे आयोजित 'मुकनायक परिसंवाद' कार्यकमात भीमराव आंबेडकर बोलत होते. यावेळी बार्टीचे माजी विभाग प्रमुख व पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सत्यंद्र चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, भंते बी सारिपुत्त उपस्थित होते.

यावेळी बोलताना, भीमराव आंबेडकर म्हणाले, वंचित, पिडीत, दलित लोकांच्या अन्यायाला वाचा फोडणारे स्वतंत्र वृत्तपत्र असावे, असा विचार 100 वर्षापूर्वी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 29 व्या वर्षी मुकनायक वृत्तपत्र सुरू केले. त्याच्या माध्यमातून लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार सांगितले. बाबासाहेबांनी वृत्तपत्राला राजकीय स्वरूप दिलं असतं, तर कदादिच वंचितांचं चित्र वेगळं दिसलं असतं.

डॉ.सत्येंद्र चव्हाण यांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास तसेच कोरेगांव भीमा संघर्षाची सांगितलेली उदाहरणे उपस्थितांसाठी रोमांचकारी ठरली. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेऊन तो इतरांना सांगता येण्यासाठी वाचन महत्वाचे असल्याचे सांगतानाच अधिकारी वर्गाने समाजाला दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन केले. तसेच तरूणांनी इतिहास समजून घेण्याबरोबरच उद्योगधंदे वाढवून आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचेही सत्येंद्र चव्हाण यांनी सांगितले.

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, साक्षरतेचे प्रमाण केवळ 3 टक्के असताना चावडीवर बसून सुशिक्षीत नागरीक वृत्तपत्राच्या माध्यमातून अशिक्षीतांना जागृत करतील या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या शिकवणीला समाजातील सर्व घटकांनी पायीक राहणे गरजेचे असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

यावेळी मुकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने पत्रकारीतेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक लोकमत चे राजीव लोहकरे व मॅक्स महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी अशोक कांबळे यांना मुकनायक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परिसंवादाच्या अगोदर प्रसिध्द गायक विजय सरतापे यांनी गायलेल्या भीमगितांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.

यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी 1 लाख 77 हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली.

यावेळी मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून वंचित शोषित, पिडीतांचे प्रश्न मांडल्याबद्दल अशोक कांबळे यांना मुकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Tags:    

Similar News