मान्सून होणार लेट, पण नेमके काय आहेत कारणं?

मान्सून लेट होणार असल्याची बातमी आली आहे. पण मान्सून लेट होण्यासाठी कोणती कारणं महत्वाची ठरतात? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा...;

Update: 2023-05-17 09:35 GMT

रखरखतं ऊन आणि अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा यापासून दिलासा मिळावा म्हणून प्रत्येकजण उन्हाळा संपून पावसाळा सुरु होण्याची वाट पाहत असतो. पण यंदा मान्सून लेट होणार असल्याची बातमी आली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडलंय.

मान्सून कधी आंदमान बेटावर हजर होणार, त्यानंतर तो कधी केरळमध्ये, कधी कर्नाटकमध्ये, कधी मुंबईत आणि कधी उत्तर भारतात हजर होणार याचं वेळापत्रक ठरलेलं असतं. पण यंदा या वेळापत्रकात बदल झालाय.

दरवर्षी 16 मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर हजर होतो. त्यानंतर 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये तर 7 किंवा 8 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र या वेळापत्रकात बदल झाला आहे. यंदा मान्सूनचं वेळापत्रक भारतीय हवामान विभागाने जारी केलं आहे. त्यामध्ये मान्सून तीन दिवस ऊशीराने केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा 4 जूनला केरळमध्ये हजर होईल.

पण मान्सूनला विलंब का होत आहे?

भारतीय हवामान विभागाने मान्सूनला विलंब होण्यामागे दक्षिण हिंदी महासागरात सुरु असलेले फॅबियन चक्रीवादळ कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. या फॅबियन चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय होण्यासाठी अडथळा येत आहे.

दक्षिण गोलार्धातून विषुवृत्त ओलांडून भारतीय उपखंडाकडे येणारा मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मेच्या शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रात सक्रीय होतो. मात्र यंदा यासाठीच अडथळा येत आहे.

आता मोका चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असतानाच मान्सूनचे वारे सक्रीय होत आहेत. त्यामुळे 22 मे पर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या मान्सूनच्या अंदाजासाठी कोणते मुद्दे महत्वाचे ठरतात?

मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण भारतातील मान्सूनपुर्व सरींचा उच्चांक, दक्षिण चीन समुद्रपृष्ठावरून होणारे दीर्घ लहरींचे उत्सर्जन, नैऋत्य हिंदी महासागरावरील वातावरणाच्या खालच्या भागातील वाऱ्यांचे प्रवाह, पूर्व विषुवृत्तीय हिंदी महासागरावरील वातावरणाच्या वरच्या भागातील वाऱ्यांचे प्रवाह आणि आग्नेय प्रशांत महासागरावरून होणारे दीर्घ लहरींचे उत्सर्जन हे घटक महत्वाचे ठरतात.

Tags:    

Similar News