कोरोना काळातही अखंडपणे प्रचार सभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पंजाबमधील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान मोदींची पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यात आली असून शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर ताफा अडवल्यानं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.
गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती असं गृहमंत्र्यालयानं म्हटलं आहे.