सोनू सुद खरंच दानवीर?, मनसेने उपस्थित केला सवाल

राज्यातील विविध राजकीय पक्ष, संस्था कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कुठे आहे, असा प्रश्न आता मनसेने उपस्थित केला आहे.;

Update: 2021-08-03 08:34 GMT

दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे खुप मोठं नुकसान झालंय. तसेच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली आहे. याचपार्श्वभूमीवर सरकारसह राज्यातील विविध राजकीय पक्ष, संस्था कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कुठे आहे, असा प्रश्न आता मनसेने उपस्थित केला आहे.

लॉकडाऊनमध्ये सोनू सूदनं परराज्यांतील मजूर, कामगार, कुटूंब यांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली होती. तसंच अन्नधान्याचं वाटपही केलं होतं. कुणी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली तर सोनू सूद मदतीसाठी सदैव तत्पर असायचा. परंतू राज्यात भयंकर पूरस्थिती होऊनही सोनू सूदनं एकदाही मदतीचा हात स्वतःहून पुढे का केला नाही, असा प्रश्न मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरे ट्विट करत म्हणाल्या की, कोव्हिड काळात सोनू सूद नावाच्या एका महान "मसीहा"चा जन्म झाला होता, पण कोकणाच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

कोव्हिड-१९ विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. भारतात लॉकडाऊन लागल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे,बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेक जण पायी प्रवास करत होते. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतःच्या खर्चाने मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं होतं. विशेष म्हणजे, जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही त्याने मदत केली होती. यासह सोनू सुदने कोव्हिडच्या संकट काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील भरपूर मदत आतापर्यंत केली आहे. मनसेने सवाल उपस्थित केल्यानंतर सोनू सुद काय प्रतिक्रीया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Tags:    

Similar News