औरंगाबाद : राज्यात गेल्या दोन महिन्यांत सरकारी विभागातील भरती प्रक्रियेचे पेपर फुटीच्या घटना समोर आल्यात. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतांनाच विभागातील पेपर लीक झाल्याचे समोर आले. या प्रकरणातही तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कसं आहे की पेपर काही पहिल्यांदाच फुटलाय असं नाहीये. आतापर्यंत अनेकदा पेपर फुटला आहे. पण ज्याने पेपर फोडला ते फुटले जात नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात. ज्या प्रकारचा वचक शासन म्हणून असायला हवा तो राहत नाहीये.
31 डिसेंबर आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल दिली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यातच रविवारी म्हाडाचा पेपर होणार होता. मात्र पेपर फुटल्याचा संशय आल्याने हा पेपर रद्द करण्यात आला. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तीन जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन एजंट बुलढाण्याचे तर एक जण पुण्यातील आरोपी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांची कारवाई केली असून मोठे मासे गळाला लागले आहेत.
जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक प्रितीश देशमुख, एजंट संतोष हरकळ आणि एजंट अंकुश हरकळ अशी आरोपींची नावं आहेत. हे आरोपी म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत होते. मात्र, विश्रांतवाडीतून रात्री दहा वाजता त्यांना ताब्यात घेतलं.