आमदार विश्वनाथ भोईरांचं ‘हेट स्पीच’...आव्हाडांनी विचारलं कारवाई कधी ?

Update: 2023-08-07 10:37 GMT

ठाणे – राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं नित्याचचं आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच जेव्हा एखाद्या समाजाविषयी अत्यंत विखारी वक्तव्यं केली जात असतील तर त्याचे राजकीय पडसाद उमटणं स्वाभाविक आहे.

Full View

शिवसेनेचे कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी सेना या संघटनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एका विशिष्ट समाजाविषयी वादग्रस्त विधान केलंय. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय.

ठाणे इथल्या गडकरी रंगायतनमध्ये १ ऑगस्ट रोजी आगरी सेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लव्ह जिहादचा मुद्दा आगरी समाजापर्यंत येऊन घरापर्यंत पोहोचल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलं. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित करणार होतो, मात्र मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. मात्र, लव्ह जिहादचा हा मुद्दा सभागृहात पुन्हा उपस्थित करणार असल्याचं भोईर यांनी सांगत, याविरोधात आता आगरी कोळी सेनेनं लढलं पाहिजे. या मुद्द्यावर पक्षातून कारवाई झाली तरी चालेल पण हा मुद्दा सोडणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भोईर यांचा त्याच कार्यक्रमातील व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून आमदार भोईर यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केलाय. एका समाजाला संपवून टाकेन अशी भाषा वापरणं हे कुठल्या कायद्याच्या कक्षेत बसतं असा थेट प्रश्नच आव्हाड यांनी उपस्थित केलाय. सर्वोच्च न्यायालयाची ‘हेट स्पीच’ संदर्भातील जी मार्गदर्शक तत्व आहेत, त्यामध्ये आमदार भोईर यांनी वापरलेली भाषा येते की नाही, हे पोलिसांनी ठरवावं, असंही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर कधी कारवाई करणार, हे पोलिसांनी जाहीर करावं, अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केलीय.

Tags:    

Similar News