बैलगाडी शर्यती सुरु करण्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावा - आ. भोसले
राज्यसरकार आणि केंद्र सरकारने या बैलगाडी शर्यतीबाबत लक्ष घालून त्या शर्यती सुरू करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.;
राज्यातील शेजारी वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडी शर्यती राज्यसरकारने सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन सातारा जिल्ह्यातील सर्व बैलगाडी धारकांनी सातारा- जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहे. या मागणीला पाठींबा देत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील राज्यसरकार आणि केंद्र सरकारने या बैलगाडी शर्यतीबाबत लक्ष घालून त्या शर्यती सुरू करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलतांना आ.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, बैलगाडा शर्यत हा ग्रामिण भागातील अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पुर्वीच्या काळी यात्रा-जत्रेच्या काळात ग्रामिण भागात बैलगाडा शर्यती होत असतं. दुरदुर वरून हजारो लोक शर्यती पाहाण्यासाठी येत असतं. अशा या जिव्हाळ्याच्या विषयात राज्य सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बळीराजा शेतकरी हा आपल्या मुलांप्रमाणे आपल्या बैलांची काळजी घेतो त्याचा संभाळ करतो. मात्र, देशात एखादी बैलांवरील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सरसकट सर्वच ठिकाणाच्या शर्यती बंद करणं योग्य नाही. पेटा संस्थेनं केलेल्या या याचिकेनंतर शर्यत बंद झाल्याने ग्रामिण भागातील नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होतं आहे.
बळीराजा हा आपल्या बैलांना इतका जीव लावतो की, कुणीही एखाद्या मुक्या प्राण्याला लावणार नाही. शिवाय बैलगाडा शर्यतीमध्ये स्वत: शेतकरी बैलगाडा चालवत असतो त्यामुळे तो आपल्या बैलांवर अत्याचार करणारच नाही. शिवाय बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा असं आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.