तौक्ते वादळ: मदतीसाठी देवेंद्र फडणवीस केंद्राला पत्र लिहिणार का? रोहित पवार
तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह काही राज्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमधे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर गुजरातला मदत ही जाहीर केली. मात्र, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर देखील नुकसान झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची भेट टाळली.
यावरुनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी गुजरात मधील प्रभावित क्षेत्राची हवाई पाहणी केल्यानंतर सर्वच प्रभावित राज्यांमधील मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली. तसेच गुजरातमधील तातडीच्या मदतकार्यासाठी १००० कोटी ₹ मदतीचं पॅकेज जाहीर केलं. हवाई पाहणी करून गुजरातसाठी तत्काळ मदत जाहीर केली ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्यासोबतच इतर राज्यांना मदत दिली नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच खेदजनक आहे.
महाराष्ट्रासह इतर सर्वच प्रभावित राज्यांना आर्थिक मदत दिली जाईल ही सर्वसाधारण अपेक्षा होती. चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार प्रभावित राज्यांच्या सरकारांसोबत काम करीत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात केंद्र सरकार ज्या ताकदीने गुजरात सोबत उभं राहिलं त्या ताकदीने इतर राज्यांसोबत उभं राहताना दिसलं नाही.
गुजरातसाठी तातडीची मदत जाहीर झाली परंतु इतर राज्यांनी त्यांचे नुकसानीचे मूल्यांकन केंद्राकडे पाठविल्यानंतर मदत दिली जाईल असं सांगण्यात आलं. सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सारखंच नुकसान झालेलं असताना केंद्र सरकारने इतर राज्यांवर अन्याय केला हे स्पष्ट आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहणं आवश्यक होतं. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. उलट गुजरात मध्ये कसं जास्तीचं नुकसान झालं हे पटवून देण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष पुढे आला असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
वास्तविक गुजरातला आपत्कालीन मदतीचं पॅकेज जाहीर केलं तेंव्हाच महाराष्ट्रासह 'तौक्ते'चा फटका बसलेल्या इतर सर्वच राज्यांना पंतप्रधानांनी मदत जाहीर करायला हवी होती, पण ती केली नाही.
महाविकासआघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.