"हिंमत बताई नहीं, दिखाई जाती है"...म्हणत आ. महेश लांडगेंचा "गनिमी कावा"
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांची "गनिमी कावा" करीत अखेर "बारी" केली.त्यामुळे आमदार लांडगे आणि पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.;
सांगली : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांची "गनिमी कावा" करीत अखेर "बारी" केली. सांगलीत प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असतानाही सांगली येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली आणि यशस्वीही करण्यात आली. त्यामुळे आमदार लांडगे आणि पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सांगली येथील जरे गावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. राज्यातील विविध ठिकाणाहून बैलगाडाप्रेमी सांगलीत दाखल झाले होते. मात्र, स्पर्धेचे आयोजक आमदार गोपिचंद पडळकर यांना पोलिसांनी नजरकैद केले होते. त्यामुळे पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहचू शकले नाहीत. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी "गनिमी कावा" करीत शर्यतस्थळी पोहोचले. सुमारे २५ किलोमीटर दुचाकी आणि पायी प्रवास करीत लांडगे यांनी पोलिसांना चकवा दिला. काहीवेळानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान, बैलगाडा प्रेमी आणि पोलिसांमध्ये काहीशी वादावादीही झाली. पोलिसांनी केलेले आवाहन बैलगाडा मालकांनी धुडकावले.
आमदार लांडगे म्हणाले की, ही स्पर्धा भरवल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आला की, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होवू शकतो. न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या पाहिजेत. शेतकऱ्यांची गाय, बैल कसायाला न देता सांभाळली पाहिजेत. परंपरा जपली पाहिजे. कायदेशीर लढाई आमची सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा बनवण्याची मान्यता दिली. राष्ट्रपती महोदयांनी स्वाक्षरी करुन मान्यताही दिली. बैल हा प्राणी संरक्षित प्रवर्गातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. न्यायालयीन लढाई लढत आहोत. शेतकऱ्यांमध्ये विश्वास जागवण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले आहेत.
हिंमत बताई नहीं दिखाई जाती है...
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढाकार घेतला होता. राजकीय पक्षभेद विसरुन शर्यतीसाठी एक होण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीत भरवण्यात आलेल्या स्पर्धेकडे आजी-माजी खासदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे सोशल मीडियावर खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बैलगाडा शर्यतप्रेमींनी "लक्ष्य" केले आहे. "नेता आणि अभिनेता यातील फरक स्पष्ट", हिम्मत बताई नहीं दिखाई जाती है, बैलगाडा शर्यतीचे भांडवल करुन निवडून आलेले अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचा बोलघेवडेपणा आणि अभिनय बैलगाडा शौकीन आणि गाडा- मालाकांना समजला असेलच? असा टोला लांडगे यांनी लगावला. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरुन सोशल मीडियावर "वॉर" सुरू होण्याची शक्यता आहे.