गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका;भाजप नेते किरीट सोमय्या यांचा घणाघात
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. वर्तनगर पोलिसांनी आव्हाड यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होते. दंडाधिकाऱ्यांनी १० हजार रोख आणि एका जामीनाच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, "सव्वा वर्षानंतर शेवटी कोर्टाने न्याय दिला. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. जितेंद्र आव्हाड सारख्या गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये.त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत. ", असं सोमय्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.