सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो- जयंत पाटील
सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो मात्र, यापैकी चंद्रकांत पाटील यांचा नेमकं काय झालं आहे याबाबत संशोधन करणं आवश्यक आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख एकेरी केला त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे, त्यावरून बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना आठवण करून देत म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणतात की, मी शरद पवार यांचे बोट पकडून राजकारण आलो आहे. चंद्रकांत पाटील यांनी कदाचित मोदींचाही खासगीत एकेरी उल्लेख केला असावा, त्यांना त्याचीच सवय असावी म्हणून त्यांनी एकेरी उल्लेख केला असावा. मात्र, महाराष्ट्राच्या संस्कृतीत याआधी असं कधी झालं नाही पण चंद्रकांत पाटील यांनी हे केलं जे चुकीचं आहे असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील राजकीय नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.
राजकीय नेत्यांनी फक्त बदल्याची कामे किंवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले की, मगच पोलीस ठाण्यात येणे बंद करावे. त्याऐवजी पोलीस ठाण्यात राबवण्यात येणारे उपक्रम आणि डेव्हप्लपमेंट बघण्यास आणि त्यास सहकार्य करण्यास येत जावे.राजकीय नेत्यांकडून पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा वाढत आहे , असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.