लोका सांगे ब्रम्हज्ञान....खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाचे नियम बसवले धाब्यावर....
लोकप्रतिनिधींनी नियम पाळले तर लोक पाळतात...पण खासदारांनीच नियम धाब्यावर बसवले तर काय....;
औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी म्हणून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी लागू करण्याचा सरकारने होता. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका करत कोरोना रात्रीच नव्हे तर दिवसा सुद्धा असतो याची आठवण करून दिली होती.मात्र आता खुद्द जलील यांना याची आठवण राहिली नसल्याचं दिसून येत आहे.
शुक्रवारी जलील यांनी औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी भागातील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमात कोविड 19 बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली.
उद्घाटन स्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे कुठेही पालन होताना दिसून आले नाही. एवढंच नाही तर इथे उपस्थिती लोकांपैकी जवळपास सर्वांनीच मास्क घातला नव्हता. त्यामुळे लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था जलील यांची झाली आहे.
राज्य सरकारने 'नाईट कर्फ्यु'ची घोषणा करताच जलील यांनी सरकारवर निशाणा साधला होता. 'करोना विषाणूने राज्य शासनासोबत काही चर्चा केली आहे का? मी दिवसा झोपलेलो असतो आणि रात्री बाहेर पडेन, असा खोचक सवाल करत जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र दिवसा कोरोना असल्याची आठवण करून देणारे जलील स्वतः कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना पाहायला मिळाले.