नथुराम गोडसेचा चित्रपटात स्वातंत्र्य सेनानी म्हणून उल्लेख, सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यात येणाऱ्या चित्रपटात भुमिका केल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभुमीवर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.;
खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भुमिका केल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत होत्या. त्यापार्श्वभुमीवर नथुरामची भूमिका साकारलेला वादग्रस्त चित्रपट why I killed Gandhi या चित्रपटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारा चित्रपट why I killed Gandhi या चित्रपटात नथुरामचा स्वातंत्र्य सेनानी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने महात्मा गांधी यांची हत्या केली म्हणून दोषी ठरवले. अशा व्यक्तीचा या चित्रपटात स्वातंत्र्य सेनानी असा उल्लेख करण्यात आला आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
तसेच या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वादग्रस्त चित्रपटाविरोधात काही संघटनांनी एकत्र येत ही तक्रार दाखल केली असून देशातील सर्व मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री चरणसिंह चण्णी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या चित्रपटावर बंदी घालावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, ३० जानेवारीला महात्मा गांधी यांची हत्या झालेल्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी कधी घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचं दर्शन घेताना वारंवार पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर गांधीजींचा वारंवार उल्लेख करतात. मात्र, गांधींजींची हत्या केलेल्या नथुरामचा उदोउदो होत असताना पंतप्रधान मोदी शांत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.