Max Maharashtra चा आठ युगांचा प्रवास, नवव्या पर्वात पदार्पण
मॅक्स महाराष्ट्रच्या स्थापनेला आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत. मॅक्स महाराष्ट्र आज 9 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.;
किरण सोनावणे,
मॅक्स महाराष्ट्रच्या स्थापनेला आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत. मॅक्स महाराष्ट्र आज 9 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
पत्रकारितेचा ब्रेन हमेरेज होऊन ती ICU मध्ये असतानाच्या काळात लोकहीत, देशहीत आणि शोषित-वंचित घटकांचा आवाज म्हणून 8 वर्षांपूर्वी "सर्वकाही शक्य आहे" हे ब्रीद घेऊन रवींद्र आंबेकर यांनी मॅक्स महाराष्ट्र सुरू केलं.
वास्तविक हा प्रयोगच प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा होता, त्यात अडथळे येणार, मित्र - विरोधक बरे वाईट सल्ले देणार आणि ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार हे अपेक्षित होते. झाले सुद्धा तसे, असंख्य अडचणी आणि अडथळे पार करून ही जणू काही आठ युगे पार करून नव्या युगात पदार्पण करीत आहोत याचे आमच्या मित्र आणि विरोधकांना जसे आश्चर्य वाटते तसे आम्हालाही वाटते. तुम्ही जेंव्हा व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकता तेंव्हा सुरुवातीला दुर्लक्ष, नंतर दडपून टाकणे आणि त्यानंतर सामील करून त्याचा फायदा उचलायचा किंवा विरोध बोथट करून टाकायचा असे प्रकार होतात. मात्र मॅक्स महाराष्ट्र त्याला जुमानले नाही. काळोखात एका मेणबत्तीची भूमिका मॅक्स महाराष्ट्र निभावित आला. यातही अनेक नवे प्रयोग मॅक्स महाराष्ट्र ने केले.
देशातील पहिला पारलिंगी ( तृतीय पंथीय ) पत्रकार मॅक्स महाराष्ट्र ने दिला, गौरव मालक या दिव्यांग तरुण विद्यार्थ्याला पत्रकार म्हणून ओळख दिली. चळवळीतील अनेकांच्या हातात पत्रकारितेचा बूम देऊन त्यांना त्यांना अभिप्रेत असणारे प्रश्न आणि अन्याय मांडण्याची संधी दिली. नवे चेहरे मॅक्स महाराष्ट्र ने प्रकाशात आणले
याकाळात प्रचंड संकट आली, दोन वर्षाचा कोरोना काळात भारतीय पत्रकारितेतून सुमारे 55 हजार पत्रकारांना मीडिया हाऊस ने नोकरी वरून काढून टाकून घरी बसवले, अनेकांना पूर्ण वेळ चे अर्धवेळ आणि 30/40 टक्के पगार कपात केली मात्र एरवी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या यावर्गाकडून थोडीफार चुळबुळ झाली त्यानंतर सारे कसे शांत शांत.अश्या नाजूक परिस्थिती मध्ये मॅक्स महाराष्ट्रने अनेकांना रोजगार दिला.
मॅक्स महाराष्ट्र दखलपात्र झाल्यावर त्याला अडचणीत आणण्याची मोहीम सुरू झाली. त्याचे आर्थिक स्रोत कापण्याचे प्रयत्न, चॅनेल हॅक करून सुमारे 2000 जीबी चा डेटा नष्ट करून, चॅनेलच्या बदनामीसाठी त्यावर अश्लील व्हिडिओ फीत टाकणे. आमचे फेसबुक, YOUTUBE खाते हॅक करणे किंवा रिपोर्ट करणे, डिलीट करणे असे सर्व प्रकार गेल्या आठ वर्षात आम्ही पाहिले
आजही आम्ही खूप स्टेबल अवस्थेत आहोत असे मात्र नाही, हेलकावे खात प्रवास सुरूच आहेत. तरीही आज आम्ही एका महिन्यात सुमारे 7 ते 8 कोटी लोकांच्या पर्यंत पोहचत आहोत. आज मॅक्स महाराष्ट्र म्हटले की पुढे अधिक काही सांगावे लागत नाही.
हा सारा प्रवास आम्ही आमची जिद्द, आत्मविश्वास आणि मुल्यावर असणारी आढळ निष्ठा यामुळे करू शकलो. मात्र हा प्रवास कधीच संपला असता जर याप्रवासात तुमच्या सारखे सहप्रवासी लाभले नसते. कारण आम्ही जे बोलत होतो, लिहीत होतो त्याला प्रतिसाद देण्याचे काम तुम्ही तुमच्या जीवनातील अमूल्य वेळ खर्च करत दिले. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर कधी पराकोटीची टिका केली मात्र आमची साथ तुम्ही सोडली नाही. तुमची कौतुकाची थाप जितकी उत्साह देते, त्याच सोबत तुम्ही केलेली सडेतोड टिका देखील आम्हाला आमच्या मांडणीवर विचार करण्यास भाग पाडते त्याचेही आम्ही स्वागत करतो
असं म्हणतात की पत्रक किंवा प्रसार माध्यम हे कुणीही चालक मालक चालवीत असलं तरी ते मुळात लोकांच्या मालकीचे असते. ते त्याला स्वीकारतात, वाढवतात, आपल्या मनात, समाजात आणि विचारात स्थान देतात त्यामुळे ते प्रसार माध्यम म्हणून मान्यता पावते. त्यामुळे विनम्रता पूर्वक संगतो मॅक्स महाराष्ट्र हे तुमचे आहे तुमचा आवाज आहे. याला आता पर्यंत जशी साथ, प्रेम आणि आपुलकी दिली तशीच आपुलकी देत राहाल, तुमच्या मदतीने आपण दोघे मिळून आपल्या जेवढी शक्ती आणि व्याप्ती असेल तितका हा समाज सर्व मानवाला राहण्यासाठी चांगला चांगला करत राहू माणुसकीच्या आड येणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या विरोधात लढत राहू.. जो पर्यंत रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय, सन्मान, स्वातंत्र्य आणि बंधूता मिळत नाही... मॅक्स महाराष्ट्रच्या आठ पर्व पूर्ण करून आपण सर्व नवव्या पर्वात पदार्पण करत आहोत आणि देश प्रजासत्ताकांची 75 वर्ष पूर्ण करत आहे दोन्हीच्या शुभेच्छा!
किरण सोनावणे
मॅक्स महाराष्ट्र