कसं द्यायचं, काय करायचं तो सरकारचा प्रश्न, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे- तानाजी सावंत
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी तुळजापूर ते मुंबई अशी यात्रा करत मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्या आंदोलनाच्या ७१ व्या दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तानाजी सावंत यांनी सरकारला इशारा दिला आहे.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी तुळजापूर ते मुंबई अशी पदयात्रा करत काही तरुण मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले. या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. यावेळी तानाजी सावंत यांना चिखलात बसून तरुणांनी मागण्या ऐकायला लावल्या. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, मराठा समाजाचे चाळीस युवक आम्ही गमावले आहेत. कुटुंब उघड्यावर पडले आहेत. मराठा आरक्षणाची ही लढाई कायदेशीर आहे. त्यामुळे कसं द्यायचं, काय करायचं हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
मी सरकारचा मंत्री नंतर आहे. मात्र मी आधी मराठा आहे. त्यामुळे वतनदार असलेल्या समाजावर सध्या बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत आंदोलन मागे घेऊन घरी जाण्याची विनंती तानाजी सावंत यांनी केली.