अदानींच्या कोळसा व्यवसायाची तात्काळ चौकशी करा – महुआ मोईत्रांचा नवा हल्ला
अदानी समूहाच्या शेअर मार्केट मधील बनवाबनवीची जाहीर चौकशी करा अशी मागणी केल्यानंतर आता खासदार महुआ मोईत्रा यांनी अदानींच्या कोळसा व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अदानींनी परदेशांमधून निर्यात केलेला कोळसा खरेदी करण्यासाठी विविध राज्यांवर दबाव टाकला जात असल्याच्या बातम्या गेले काही वर्षे येत होत्या, या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांनी कोळसा खरेदीच्या व्यवहारांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.;
मध्यंतरी पंजाब सरकारला समुद्र आणि रेल्वे मार्गे कोळसा आणण्याची सूचना केंद्र सरकारने केल्याची माहिती काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी ट्वीट केली होती. पूर्वेकडच्या राज्याकडून पंजाब सरकारने घेतलेला कोळसा थेट रेल्वेने पंजाबला नेण्याएवजी समुद्रमाग्रे कन्याकुमारीला वळसा घालून आधी गुजरात आणि नंतर तिथून रेल्वेमार्गे पंजाबला नेण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्याची माहिती मनीष तिवारी यांनी दिली होती. रेल्वे-समुद्र-रेल्वे मार्गे पंजाबला कोळसा नेणे महाग पडत असले तरी आयात कोळशापेक्षा ते स्वस्तच पडेल असा युक्तीवाद केंद्र सरकारतर्फे करण्यात आला होता. कसंही करून अदानींच्या ताब्यात असलेल्या बंदरांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप ही मनीष तिवारी यांनी केला होता. या संदर्भात केंद्र सरकारचं एक पत्र ही त्यांनी पुरावा म्हणून जोडलं होतं. या पत्रानंतर भाजपच्या आयटी सेल ने मनीष तिवारी यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न ही केला होता.
अदानी यांनी ऑस्ट्रेलिया तसंच इतर काही देशांमध्ये कोळशाच्या खाणी घेतल्या आहेत. तेथील कोळसा ते भारताला विकतात आणि केंद्र सरकार अदानींचा हा कोळसा आयात करण्यासाठी विविध सवलतींचा मारा करतं असा आरोप करण्यात येत आहे. अदानींच्या या कोळसा व्यवहारांची ही तात्काळ चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केली आहे. कोळसा उद्योग ही अदानींची अनधिकृत कॅश काऊ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्येक भारतीयांच्या जीवावर हा उद्योग चालला आहे असं ही महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे.