...म्हणुन महाराष्ट्रात सरसकट लसीकरण करा: आनंद महिंद्रांचे केंद्राला साकडे

महाराष्ट्रात अधिकृतपणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची घोषणा केली असताना उद्योजक आनंद महींद्रा यांनी महाराष्ट्र देशाच्या आर्थिक केंद्रस्थानी असल्यानं महाराष्ट्रात सरसकट ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना लसीकरण करावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.;

Update: 2021-03-16 08:29 GMT

गेलं अख्ख वर्ष कोरोनामय गेल्यानंतर दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आलेख सतत वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनारुग्णांची संख्या आणि मृत्यू नोंदवून राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

देशभरामध्ये दिवसभरात सापडणाऱ्या नव्या करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र मागील काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालय आणि देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्रात सरसकट लसीकरणाला परवानगी देण्यात यावी अशी इच्छा ट्विट करुन व्यक्त केल्या आहेत.

समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्या महिंद्रा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अरोग्यमंत्र्यांना टॅग करत महाराष्ट्र हे राज्य आर्थिक दृष्ट्या अंत्यंत महत्वाचं असून सध्याची करोना रुग्णांची वाढ पाहता महाराष्ट्रापुरतं तरी सरसकट लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केलीय. "रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आणखीन लॉकडाउन राज्याला आर्थिक दुष्ट्या कमकुवत करणारे ठरतील. त्यामुळेच ज्यांना ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना लसीकरणाची तातडीची परवानगी देण्याची गरज महाराष्ट्रात आहे. लसींची कमतरता नाहीय," असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि हर्षवर्धन यांना टॅग केलं आहे. राज्यात सोमवारी करोनाच्या १५,०५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून दुसऱ्या लाटेची सूचना देत कोरोना नियंत्रणासाठी अनेक सूचना दिल्या आहेत.

Tags:    

Similar News