रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत, 22 मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून रु.१५००/- एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत आज 19 मेला अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा चालकांना देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद याची नोंद करावी लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.
याबाबत कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. दि. २२.०५.२०२१ पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण दि. २१.०५.२०२१ रोजी करण्यात येणार आहे.
रिक्षा चालकांना देण्यासाठी शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला असल्याने, ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे. अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.